चिंतन अध्यात्माच्या नादाने विज्ञानाकडे पाठ फिरवलेला भारत 

बातमी शेअर करा.

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी शहर मध्ये प्रसिद्ध साई बाबा मंदिर आहे.लाखों भक्तांच्या दुख मुक्तीसाठी ते प्रसिद्ध आहे. श्रद्धा सबुरी आणि भक्ति समोर सर्व आधुनिक तंत्रज्ञान स्पेशल फेल आहे. त्या ठिकाणी भक्त दरवर्षी पायी पदयात्रा काढतात. आणि सर्व संकटवर मात करतात.अशा ऐतीहासिक मंदिराच्या मुख्य द्वाराजवळ 22 ऑक्टोबर 2025 ला साई सिल्क बिग बाज़ार मध्ये रात्री भीषण आग लागली.आग कशी लागली हा बिनडोक लोकांचा प्रश्न आहे.आग येवढी भयंकर होती कि आजूबाजू चे काही दुकाने त्या आगीच्या लपेट मध्ये आले आणि लाखोंचे नुकसान झाले.मानव निर्मित अग्निशामक दलाने ती विजवली असे नास्तिक लोकांकडून सांगितले जाते.आधुनिक तंत्रज्ञान फेल का गेले असे लोक म्हणजे भक्त विचारू शकत नाही कारण हा श्रद्धा सबुरी आणि भक्तिचा अध्यात्माचा मार्ग आहे त्यावर अविश्वास दाखवून प्रश्न विचारण्याचा अधिकार माणसांना नाही. असो…..

    गेल्या दीड हजार वर्षांत भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र,जीवशास्त्र,वैद्यकशास्त्र अशा विविध क्षेत्रांत क्रांतिकारी शोध लागले. त्या शोधांवर आधारित तंत्रज्ञान विकसित झाले आणि जग अधिक सुविधापूर्ण, सुरक्षित व वैज्ञानिक झाले.पण या जागतिक शोधयात्रेत भारतीय नाव मात्र क्वचितच दिसते.तरीही आपण “हे सर्व आमच्या त्रिकालज्ञ ऋषींनी वेदांत सांगितले, पाश्चात्त्यांनी ते चोरले” असा आत्मवंचित दावा करतो, आणि त्यावर टाळ्या देखील वाजवतो. हीच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय शोकांतिका आहे.

   इ.स. ५०० नंतर भारतीय समाजाने ऐहिक जीवनाकडे पाठ फिरवली. “हे जग मिथ्या, खरे ते परलोकात” हा समज कथा,कीर्तन,पुराणनिरूपणांतून खोलवर रुजला.  विज्ञानाची पायाभूत बीजे असलेले प्रश्न विचारणे,निरीक्षणे करणे,कुतूहल बाळगणे, ही सर्व प्रक्रिया खुंटली.इहलोक नको,परलोक हवा या प्रवृत्तीने भारतीय बुद्धिमत्ता धर्मकथांच्या भोवऱ्यात अडकून पडली.

पाऊस का पडतो ?, ऋतू का बदलतात?, चंद्र खाली का पडत नाही ?,पाणी उताराकडे का वाहते ? असे मूलभूत प्रश्न बहुसंख्यांना कधी पडलेच नाहीत.जेव्हा गार्गीसारख्यांना पडले, तेव्हा उत्तर “परमात्मा तसे करतो” हे दिले गेले, आणि कुतूहल संपले.विचार थांबला की शोध जन्माला येत नाही. हेच भारतात घडले.

न्यूटन जर आपल्या प्रश्नांसाठी धर्मगुरूकडे गेला असता,तर त्याच्याही माथी “ईश्वराची करणी” असेच उत्तर आले असते.मग गुरुत्वाकर्षणाचा नियम जन्मलाच नसता.पण न्यूटनने श्रद्धेपेक्षा संशय निवडला आणि जग बदलले.आपण मात्र गार्गीसारखे उत्तर ऐकून शांत झालो.

  भारत अध्यात्माऐवजी भौतिक संशोधनाकडे वळला असते, तर भारताच्या तांत्रिक प्रवासाची दिशा किती वेगळी असती याची कल्पना सुद्धा चकित करणारी आहे. पण या प्रज्ञावंतांची क्षमता मोक्ष,ब्रह्मसाक्षात्कार,अद्वैत आणि अदृश्य शक्तींच्या शोधात खर्च झाली.पांडवकाळात दळणासाठी जी जात्यासारखी साधने होती,तीच साधने पेशवाईत होती. शतकानुशतके सुधारणा नाही.वैज्ञानिक विचार नसेल तर साधने,तंत्रज्ञान, उत्पादनक्षमता काहीच बदलत नाही.परिणामी देश मागेच राहतो.

    संत,कवी,पुराणे,व्रत-महात्म्ये,अभंग…हजारो ग्रंथ लिहिले गेले.पण या धार्मिक साहित्याच्या उदंड पिकातून एकाही शोधाचा जन्म झाला नाही. विज्ञानमूलक विचार दाबला गेला, अध्यात्माला खोटा वैज्ञानिक मुखवटा लावला गेला आणि भारताची प्रगती अडखळली.भारत विज्ञानात मागे पडण्याचे मुख्य कारण म्हणजे अध्यात्म,मोक्षप्राप्ती आणि जन्म-मरणाच्या काल्पनिक फेर्‍यांतून सुटका करण्याच्या वेडाने समाजाला पकडून ठेवणे.आजही अनेक जण “विज्ञान मिथ्या,अध्यात्म सत्य” असे मानतात आणि म्हणूनच विज्ञान आपल्यापासून दूर पळते.

    भारताला पुढे न्यायचे असेल,तर परलोकाच्या ध्यासातून बाहेर येऊन इहलोकातील प्रश्नांची उत्तरे विज्ञानात शोधावी लागतील. कुतूहल पुन्हा प्रज्वलित करावे लागेल.संशय, प्रयोग आणि निरीक्षण यांची संस्कृती रुजवावी लागेल.मानवाच्या जीवनातील दु:ख २००/३०० किलोमीटर पायी पदयात्रेने मिटत असतील,तर मंदिरासमोर दुकानाला लागलेली आग  विझविण्यास मानवाला का यावे लागले. हा प्रश्न विना चपल पायी पदयात्रा काढणाऱ्या आणि हातात स्मार्ट मोबाइल असणाऱ्या तरुणांना का पडत नाही?. हा लेख लिहण्या मागील उदेश कोणाच्या धार्मिक भावना दुखवण्यासाठी नाही तर चिंतन अध्यात्माच्या नादाने विज्ञानाकडे पाठ फिरवलेला भारतातील तरुणांना अज्ञान आणि विज्ञान ही सत्य दाखवून देण्याचा प्रयत्न आहे.काही संपादकांना या लेखातील वस्तुस्थिती मान्य नसेल कारण त्यांच्यात त्यांचे भावनिक, सामाजिक,आर्थिक हितसंबंध त्यात गुंतलेले असतील तर त्यांनी लेख प्रसिद्ध केला नाही तरी हरकत नाही. पण त्यामुळे वस्तुस्थिती खोटी ठरणार नाही,प्रबोधनातून परिवर्तन थांबणार नाही.ही अनेक घटनातील संदर्भ घेऊन हा लेख लिहला आहे. 

सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *