
काही मानस आपल्या आचरण व बोलण्याने दिलखुस व्यक्तिमत्वाने ओलखलेले जातात. त्यात “झाला विधी, द्या निधी, पुन्हा कधी?” अशा पध्दतीने आपल्याच पेशावर मिश्किल टिपण्णी करणारे ७४ वर्षाचे तरुणांना लाजविल अशी धडपड करणारे निष्ठावंत बौध्दाचार्य दयानंद बगाडे गुरुजी यांचे आज सकाळीच निद्रेमध्ये निधन झाले. पुढच्याच पाच,सहा दिवसांत त्यांची पंचाहत्तरी सुमेध जाधव व आम्ही मित्रांनी साजरी करायचे ठरवले होते.पण त्या आधीच त्यांनी ॲक्झिट घेतली.आरोग्य ठीक नसतांना ही ५/६ डिसेंबर ला शिवाजी पार्क च्या प्रत्येक बूक स्टॉलवर आवर्जून भेट घेत होते.त्यांना सागर तायडे,चंद्रकांत गमरे यांनी विचारले गुरुजी तबेत ठीक नसतांना अशा गर्दीच्या ठिकाणी फिरणे योग्य नाही असे म्हणल्यावर ते म्हणाले बायको हेच म्हणत होती. मी तिला सांगितले मी घरात मेलो तर तू एकटीच रडशील शिवाजी पार्क वर मेलो तर इतिहासात नांव लिहले जाईल.तीस वर्ष दरवर्षी महापरिनिर्वाण दिनाला आलेल्या ७४ वर्षाच्या बौध्दाचार्यचे दुखद निधन.नंतर नांव येईल दयानंद बगाडे गुरुजी.
ही बातमी आमच्या उठाव साहित्य मंचासाठी अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. कारण बगाडे गुरुजी हे आमच्या उठावचे कायमस्वरुपी हक्काचे सदस्य होते. उठावचा कोठेही कार्यक्रम असो,बगाडे गुरुजी तेथे पोहोचणार म्हणजे पोहोचणारच. गुरुजी हे चोखंदळ असे प्रभावी प्रवचनकार होते.आमच्या कवितांचा ते आपल्या प्रवचनात मुक्तपणे वापर करत असत.स्वच्छ शुभ्र सदरा,सफेद लेंगा व खांद्यावर काषाय रंगाची शबनम,हा गुरुजींचा नेहमीचा पेहराव. स्वभाव बंडखोर.सतत तरुण मुलांबरोबर उठणं, बसणं.त्यामुळेच त्यांचे समवयस्क नेहमीच त्यांच्यापासून चार हात लांबच असायचे.सतत तरुण मुलांबरोबर वावरणारा हा चाकोरीबाहेरचा अवलिया होता.
माझ्या वडिलांच्या व माझ्या आईच्या पुण्यानुमोदनचा कार्यक्रम बगाडे गुरुजींनीच केला होता.त्यावेळेस आमच्या मोरे परिवारातील सर्व तरुण,तरुणींना मंचावर सभोवती बसून त्यांनी त्यावेळेस हा पुण्यानुमोदनचा विधी केला होता,हे विशेष.नुकताच उठाव साहित्य मंचाच्या मासिक कविसंमेलनात त्यांचं प्रमुख वक्ता म्हणून आम्हाला मार्गदर्शन झालं होतं.अत्यंत मिलनसार,हसतमुख व आंबेडकरी चळवळीची अत्यंत सजग जाणीव असणारं एक मोठं व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं आहे.सुमेध जाधव,विवेक मोरे,बबन सरवदे यांच्या सह शहिद भागवत जाधव स्मृती केंद्र व उठाव साहित्य मंचाच्या वतीने दयानंद बगाडे गुरुजींनाविनम्र अभिवादन!.
विवेक मोरे यांस कडून
