बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशन’ची राज्यस्तरीय बैठक संपन्न; बौद्ध अल्पसंख्याक प्रमाणपत्रासह पाच ठराव मंजूर

बातमी शेअर करा.

राजाभाऊ कदम यांच्या अध्यक्षतेखाली राज्य व जिल्हा कार्यकारिणीची घोषणा.

जतिन मोरे ठाणे : रविवार दि. ८ मार्च २०२६ रोजी “बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशन” ची राज्यस्तरीय बैठक ठाणे येथे पार पडली. या बैठकीस राज्यातील सुमारे २५ जिल्ह्यांतील प्रतिनिधी व सदस्य उपस्थित होते. या बैठकीचे अध्यक्षस्थान राजाभाऊ कदम यांनी भूषवले.
       यावेळी सेवानिवृत्त मंत्रालय अधिकारी रमेश धिवारे यांनी “बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशन”ची भूमिका स्पष्ट करताना अल्पसंख्याक संकल्पनेचा ऐतिहासिक संदर्भ मांडला. त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजासाठी केलेल्या राजकीय व सामाजिक हक्कांच्या मागण्यांचा आढावा घेतला. धर्मांतरित बौद्ध समाजाला १९९२ मध्ये केंद्र सरकारकडून अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यामुळेच संघटनेच्या नावात ‘मायनॉरिटी’ हा शब्द समाविष्ट करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.या बैठकीत मिशनची केंद्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.त्यामध्ये राजाभाऊ कदम (अध्यक्ष), ॲड.अरियं बौद्ध (कार्याध्यक्ष), रमेश धिवारे (सरचिटणीस), ॲड.. अशोकराज मोहोड (मुख्य सल्लागार), ॲड.वर्षाताई कांबळे (सचिव) आणि योजनताई लोखंडे (खजिनदार) यांची निवड करण्यात आली. तसेच राज्यातील आणि जिल्ह्यातील विविध विभागांसाठी अध्यक्ष,उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. दरम्यान, बैठकीत बौद्ध अल्पसंख्याकांच्या हितासाठी पाच महत्त्वाचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. त्यामध्ये राज्य सरकारकडून “बौद्ध अल्पसंख्याक प्रमाणपत्र” देणे, धार्मिक अल्पसंख्याकांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देणे, अल्पसंख्याकांवरील अन्याय-अत्याचार रोखण्यासाठी स्वतंत्र कायदा करणे, विधानमंडळात अल्पसंख्याक कल्याण समिती स्थापन करणे आणि जिल्हा अल्पसंख्याक समित्यांवर बौद्ध समाजाला प्रतिनिधित्व देणे या मागण्यांचा समावेश आहे. यावेळी राजाभाऊ कदम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत बौद्धमय करण्याचा केलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी बौद्ध समाजाने संघटित होऊन काम करण्याचे आवाहन केले. शेवटी उपस्थितांचे आभार मानून बैठकीची सांगता करण्यात आली.

“ महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातिव्यवस्थेचे समूळ उच्चाटन करून भारत बौद्धमय करण्याचा संकल्प केला होता. बौद्ध समाजाला मिळालेला अल्पसंख्याक दर्जा हा त्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी मोठी संधी आहे. या संधीचा योग्य वापर करून बौद्ध समाजाने संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी पुढे यावे आणि सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात प्रगती साधावी.”
                      राजाभाऊ कदम – ९७६८८३३८११ अध्यक्ष, बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशन, महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *