डॉ. बाबासाहेब आंबेडकर पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा प्रथम बॅचचा एक दिवसीय अभ्यास दौरा उत्साहात संपन्न

बातमी शेअर करा.

राजगृह दादर मुंबईतील आंबेडकरी वारशाचा प्रत्यक्ष अभ्यास.

नवी मुंबई,(चंद्रशेखर हेंडवे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा, शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा तसेच मुंबईतील त्यांच्या वास्तव्याशी निगडित ऐतिहासिक वारशाचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याच्या उद्देशाने मुंबई विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ऐरोली नवी मुंबई यांचे संयुक्त असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विचार पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रथम बॅचचा एक दिवसीय मुंबई अभ्यास दौरा 3 सप्टेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या अभ्यास दौऱ्यात ५० पेक्षा अधिक विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबीयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
आंबेडकरी जीवनकार्याशी निगडित ऐतिहासिक स्थळांना भेट


अभ्यासक्रमाचा भाग म्हणून आयोजित या दौऱ्यात विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी,वास्तव्याशी आणि सामाजिक-शैक्षणिक चळवळीशी निगडित विविध ऐतिहासिक स्थळांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचा अभ्यास केला.या दौऱ्यात दादर येथील चैत्यभूमी,राजगृह,वरळी येथील माता रमाबाई आंबेडकर समाधी स्मारक,सिद्धार्थ कॉलेज(बुद्ध भवन),आंबेडकर कॉलेज वडाळा तसेच परळ येथील बी.आय.टी.चाळ अशा महत्त्वपूर्ण स्थळांचा समावेश होता.
या स्थळांमधून बाबासाहेबांच्या जीवनातील विविध पैलू, त्यांचा संघर्ष, ज्ञानसाधना, सामाजिक चळवळ आणि मुंबईशी असलेले त्यांचे अतूट नाते विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवता आले.


बुद्ध भवनातील बाबासाहेबांचा ऐतिहासिक ठेवा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू
अभ्यास दौऱ्यातील सर्वांत विशेष आणि प्रेरणादायी टप्पा म्हणजे सिद्धार्थ कॉलेज, बुद्ध भवन येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभ्यासाशी संबंधित ऐतिहासिक ठेव्याचे प्रत्यक्ष दर्शन व अभ्यास करण्याची मिळालेली संधी.
बाबासाहेब ज्या खोली क्रमांक ३२ मध्ये अभ्यास, बैठका व चर्चा करीत असत, त्या खोलीशी संबंधित ऐतिहासिक माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. तसेच त्यांची लायब्ररी, त्यांनी लिहिलेल्या नोंदी व डायऱ्या, त्यांनी वापरलेल्या वस्तू, खुर्ची, पुस्तकांचा मोठा संग्रह तसेच ब्रिटिशांकडून प्राप्त झालेला विविध पुस्तकांचा संच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहता आला.
बाबासाहेबांच्या ज्ञानसाधनेचे हे प्रत्यक्ष दर्शन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी ठरले. पुस्तकांमधून अभ्यासलेला इतिहास प्रत्यक्ष वास्तू, वस्तू, नोंदी आणि पुस्तकांच्या माध्यमातून अनुभवण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता, अभिमान आणि प्रेरणेची भावना निर्माण झाली.


मान्यवरांचे मार्गदर्शन-या अभ्यास दौऱ्यादरम्यान प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ व पुणे विदयापीठ कुलगुरू, अर्थशास्त्रज्ञ डॉ.नरेंद्र जाधव, सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राचार्य विजय पवार तसेच मोहिते सर यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि वैचारिक कार्याचा विविध पैलूंमधून अभ्यास करता आला.
बेस्टचे अधिकारी मिलिंद गायकवाड यांचे विशेष योगदान या दौऱ्यात बेस्टचे अधिकारी असलेले आणि अभ्यासक्रमातील विद्यार्थी मिलिंद गायकवाड यांनी मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित विविध स्थळांची इत्यंभूत सविस्तर माहिती दिली.
मुंबईतील ऐतिहासिक वास्तू, बाबासाहेबांचे वास्तव्य, त्यांच्या कार्याशी असलेला प्रत्येक स्थळाचा संबंध आणि त्या स्थळांचे ऐतिहासिक महत्त्व त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यामुळे संपूर्ण अभ्यास दौऱ्याला अधिक माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि जिवंत स्वरूप प्राप्त झाले.मिलिंद गायकवाड यांनी केलेल्या या विशेष योगदानाचे सर्व विद्यार्थ्यांनी कौतुक केले.विद्यार्थी म्हणून पुन्हा शिकण्याचा आनंद या अभ्यास दौऱ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सहभागी विद्यार्थी विविध क्षेत्रांत कार्यरत असतानाही त्यांनी स्वतःला ‘विद्यार्थी’ या भूमिकेत ठेवून संपूर्ण दौऱ्याचा अभ्यासपूर्ण अनुभव घेतला.
या बॅचमध्ये वकील,शिक्षक, पोलीस अधिकारी-कर्मचारी, अभियंते, पत्रकार,बँक, आणि अधिकारी-कर्मचारी, विविध शासकीय व निमशासकीय विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच सेवेतून निवृत्त झालेले आणि विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले नागरिक सहभागी झाले होते.व्यावसायिक आणि सामाजिक जीवनातील विविध अनुभव असलेले हे सर्वजण बाबासाहेबांच्या विचारांचा अभ्यास करण्यासाठी पुन्हा विद्यार्थी बनले. ज्ञानाला वयाची मर्यादा नसते आणि शिकण्याची प्रक्रिया आयुष्यभर सुरू राहते, याचा सुंदर प्रत्यय या अभ्यास दौऱ्यातून आला.
अभ्यासासोबत आनंद, मैत्री आणि अविस्मरणीय आठवणी
अभ्यासपूर्ण स्वरूप असलेल्या या दौऱ्यात ज्ञानार्जनासोबतच आनंद, उत्साह, हर्षोल्हास आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांसोबत कुटुंबीयांनीही सहभाग घेतल्यामुळे या उपक्रमाला कौटुंबिक स्वरूप प्राप्त झाले.
दिवसभराच्या प्रवासात ऐतिहासिक स्थळांना भेटी, माहितीचे आदान-प्रदान, चर्चा आणि सहकाऱ्यांसोबतचे आनंदाचे क्षण यामुळे हा दौरा सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.दौऱ्यात सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी “हा आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव आहे. अभ्यास, इतिहास, विचार आणि आनंद यांचा असा संगम असलेली सहल पुन्हा होणे सहज शक्य नाही,” अशा भावना व्यक्त केल्या.या दौऱ्यातील अनेक सुंदर क्षण आणि आठवणी सर्वांनी आपल्या मनात कायमच्या जतन केल्या.
प्रथम बॅचचा प्रेरणादायी उपक्रम मुंबई विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयक पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रथम बॅचने नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित केलेल्या या अभ्यास दौऱ्याला विद्यार्थ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.अभ्यासक्रमातील सैद्धांतिक ज्ञानाला प्रत्यक्ष ऐतिहासिक स्थळांच्या भेटीची जोड देणारा हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा, जीवनसंघर्षाचा, ज्ञानसाधनेचा आणि ऐतिहासिक वारशाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा हा अभ्यास दौरा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील एक प्रेरणादायी, ज्ञानवर्धक आणि अविस्मरणीय पर्व ठरला.
सहभागी विद्यार्थी व सदस्य:-नीता डुबे, सुनीता दौंडकर, सानिका शेट्ये, रविंद्र शेजोळे, चंद्रशेखर हेंडवे, माधुरी लोखंडे,अश्विनी लोखंडे, हर्षवर्धन गोडबोले, मिलिंद गायकवाड, अमित कासारे, प्रकाश देठे, उषा देठे, स्मिता लोखंडे, अजय वाघमारे, मोहन गायकवाड, रुपाली शिंगे, राजेश शिंगे, अनुष्का मोरे, यशवंत गोडघाटे, रेवती नायर, विकास जगताप, पूनम जगताप, दीपक गवई, कल्पना गोसावी, आशा गायकवाड, सुयोग खरे, सिद्धार्थ शिरसाळे, रवींद्र केदारे, रमेश शिराळ, सुमेध पारधे, मैत्रेयी सोनवणे, अनुराधा शेजोले, वंदना अंभोरे, प्रज्ञानंद रघुनाथ गायकवाड, राजेश कांबळे, दत्तात्रय गायकवाड, साहेबराव घोडेस्वार, संध्या बिडकर, राजेश सातपुते, मिस सातपुते, छाया गोसावी, भारती शिराळ आदींचा सहभाग होता.

शब्दाकंन: चंद्रशेखर गो. हेंडवे –9930903664,यांस कडून 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *