आंबेडकरी चळवळीचे निर्भीड पत्रकार रतनकुमार साळवे यांना घडविणाऱ्या माऊलीचा गौरव; पुरस्कार स्वीकारताना साळवे भावुक

विशेष प्रतिनधी छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण भागातील एका खेड्यात शेतमजुरी करून संसाराचा गाडा ओढताना आपल्या मुलांना शिक्षणाची वाट दाखविणाऱ्या आणि त्यांच्यात स्वाभिमान, संघर्ष व सामाजिक बांधिलकीची बीजे रुजविणाऱ्या गयाबाई नामदेव साळवे यांच्या जीवनकार्याला मरणोत्तर ‘माता रमाई समाजभूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. दिवंगत.पुंजाजी बाबा बहुउद्देशीय प्रतिष्ठान,छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार त्यांचे सुपुत्र तथा आंबेडकरी चळवळीचे वृत्तपत्र दैनिक ‘निळे प्रतीक’चे संपादक रतनकुमार साळवे आणि त्यांच्या परिवाराने स्वीकारला.

गयाबाई साळवे या अशिक्षित असल्या तरी शिक्षणाचे मोल जाणणाऱ्या कष्टाळू आणि जिद्दी माता होत्या.परिस्थितीने त्यांच्या हातात लेखणी दिली नाही; मात्र शेतमजुरीच्या घामातून त्यांनी आपल्या मुलांच्या हातात शिक्षणाची मशाल दिली.स्वतःच्या पोटाला चिमटा काढून मुलांच्या शिक्षणासाठी पैसा उभा केला आणि आपल्या कुटुंबापुरता नव्हे, तर समाजासाठी उभा राहणारा पुत्र घडविला. त्यांच्या संस्कारातून घडलेल्या रतनकुमार साळवे गेल्या वीस वर्षांपासून स्वावलंबी,स्वाभिमानी आणि प्रखर विचारधारेने आंबेडकरी चळवळीचे पत्रकारिता क्षेत्रातील कार्य पुढे नेत आहेत.
हा पुरस्कार केवळ एका मातेचा सन्मान नसून कष्टकरी मातृत्व, त्याग आणि संस्कारांच्या सामर्थ्याचा गौरव असल्याचे मत पुरस्कार प्रदान करताना दिवंगत .पुंजाजी बाबा बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष एकनाथ त्रिभुवन यांनी व्यक्त केले. ‘मुलांनी शिकावे, घडावे आणि समाजासाठी आधारवड बनावे’, हे प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते. गयाबाई साळवेंनी परिस्थितीशी दोन हात करत हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविले. अशा माऊलीचा सन्मान करणे ही समाजाचीच कृतज्ञता असल्याचे त्यांनी सांगितले.
पुरस्कार स्वीकारताना रतनकुमार साळवे यांचा कंठ दाटून आला. “माझ्या आईला आयुष्य असतानाच प्रा.विजयकुमार गवई यांनी तिचा सत्कार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी तिची प्रकृती ठीक नसल्याने ती पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहू शकली नाही. आज तिच्या नावाने जाहीर झालेला हा पुरस्कार स्वीकारताना ती स्वतः तो पाहू शकत नाही, ही खंत मनात कायम राहील,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.“माझ्या माऊलीच्या कष्टांची, त्यागाची आणि संस्कारांची दखल घेणारे प्रा. विजयकुमार गवई आणि एकनाथदादा त्रिभुवन यांचा मी सदैव ऋणी राहीन,” असेही साळवे यांनी कृतज्ञतेने नमूद केले.
गयाबाई साळवे यांनी आपल्या आयुष्यभराच्या कष्टातून एक कुटुंब उभे केले; परंतु त्यांच्या संस्कारातून घडलेला मुलगा आज सामाजिक न्याय,समता आणि आंबेडकरी विचारांचा आवाज पत्रकारितेतून बुलंद करीत आहे. त्यामुळे त्यांच्या सन्मानामागे एका व्यक्तीचा नव्हे, तर ‘माऊलीच्या त्यागातून घडलेल्या सामाजिक जाणिवेचा’ गौरव दडलेला आहे, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट उपस्थित होते. यावेळी प्रा.डॉ.ऋषिकेश कांबळे,रतनभाई खंडागळे, एकनाथ त्रिभुवन,स.सो.खंडाळकर, प्रा.बाबासाहेब लिहिणार,रेखा राऊत,शिवनारायण गायकवाड, अंबादास रगडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात रविवारी हा सन्मान सोहळा उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांतीलाल पवार व पंकज शिंदे यांनी केले, तर आभार एकनाथ त्रिभुवन यांनी मानले.


