शिक्षणव्यवस्थेतील मनुवाद !

बातमी शेअर करा.

एकदा देशभर भ्रमंती करणारे सुप्रसिद्ध व्याख्याते लेखक विचारवंत कालवश हरी नरके यांची भेट घडली. शिक्षणव्यवस्थेतील मनुवादाची चर्चा करीत असताना त्यांनी एक ऐतिहासिक प्रसंग सांगितला. आज तोच इथं सांगण्याचं प्रयोजन आहे.   डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना लहानपणी तथागत सम्यक संबुद्ध यांचा चरित्रग्रंथ भेट देणारे ‘सत्यशोधक’ केळुस्कर गुरुजी सर्वांना परिचित आहेत. हे केळुस्कर लहानपणी अभ्यासात फार हुशार होते. नेहमी पहिल्या पाच विद्यार्थ्यांत त्यांचा नंबर यायचा. म्हणून त्यांना ‘जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती’ भेटायची.

      जगन्नाथ शंकरशेट हे मुंबईतील सोनार जातीचे शिक्षणप्रेमी धनाढ्य कार्यकर्ते महात्मा फुले यांचे समकालीन होते.हुशार विद्यार्थ्यांस प्रोत्साहन व मदत म्हणून त्यांनी आपल्या नावे अनेक शिष्यवृत्त्या जाहीर केल्या होत्या.त्यातील एक शिष्यवृत्ती हा केळुस्कर नावाचा कुणबी मराठ्याचा गरीब परंतु हुशार विद्यार्थी मिळवायचा.या केळुस्करांना बर्वे नावाचे एक ब्राह्मण जातीचे शिक्षक होते.हे बर्वे फार जातीयवादी होते. कुणब्याचा हा हुशार मुलगा जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळवतो,याचं त्यांना मनस्वी दु:ख होत असे. ‘काय रे कुणबटा ! तू शिकून काय दिवे लावणार आहेस ?’ असे त्यांचे कुत्सित शब्द या लहानग्या मुलाला नेहमी ऐकावे लागत. हा कुणब्याचा पोरगा शिकला नाही तर ही जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती एखाद्या ब्राह्मणाच्या मुलाला मिळेल,असा मनुवादी विचार या बर्वेंच्या डोक्यात नेहमी घोळत असे.म्हणून ते येता जाता या कुणबी समाजाच्या केळुस्कर नावाच्या हुशार मराठा विद्यार्थ्याचा दु:स्वास करीत असत. 

      एकदा लहानगा केळुस्कर आजारी पडला व त्यामुळे त्याला पहिल्या पाच विद्यार्थ्यांत येणं जमलं नाही.नेमक्या याच संधीचा फायदा घेऊन या जातीयवादी बर्वेंने विद्यार्थी केळुस्कराचं नाव शाळेतून काढून टाकलं. बिचारा लहानगा केळुस्कर विनवण्या करू लागला.परंतु बर्वेंच्या काळजाला पाझर फुटला नाही. मुलाची शिक्षणाची आवड बघून केळुस्करांचे वडील बर्वेंना भेटायला गेले.डोक्यावरचं पागोटं काढून त्यांनी आपलं मस्तक बर्वेंच्या पायावर ठेवलं व मुलासाठी करुणा भाकली.परंतु डोक्यात ब्राह्मण्यवर्चस्वाचा किडा वळवळत असणाऱ्या बर्वेंनी त्या अवस्थेतील केळुस्करांच्या वडिलांना लाथ मारली. अपमानित होऊन बापलेक रडत रडत वर्गाबाहेर पडले.जाता जाता केळुस्करांच्या वडीलांच्या मनात शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटावं,असा विचार आला. तिथे गोडबोले नावाचे मुख्याध्यापक होते. जातीने अर्थातच ब्राह्मण ! केळुस्करांना न्याय मिळण्याची आशा अगदी आमावस्येच्या काळ्याभोर रात्रीसारखीच वाटली असणार ! परंतु भेटून तर बघू ,असा विचार करून ते गोडबोलेंना भेटले. 

     लहानग्या केळुस्करची व्यथा ऐकून गोडबोलेंनी बर्वेंना बोलावून घेतलं व पुढील महिन्यात परीक्षा होईपर्यंत केळुस्करांना शाळेत बसण्याची परवानगी दिली. बर्वे काहीबाही कारणं सांगू लागले तेव्हा गोडबोलेंनी त्यांना निलंबित करण्याची धमकी दिली. तेव्हा कुठं बर्वेंनी नाइलाजानं लहानग्या केळुस्करला शाळेत बसू दिलं.नंतर महिनाभरात परीक्षा देवून केळुस्कर पहिल्या पाचात आले व शिष्यवृत्ती मिळवून पुढे शिकू लागले.  गोडबोलेंविषयी कृतज्ञता व्यक्त करायला केळुस्कर बापलेक गेले असता त्यांनी सांगितले की,त्यांच्यावर देखील असाच काहीसा प्रसंग उद्भवला होता. परंतु महात्मा फुले यांनी सहकार्य केल्यामुळे ते पुढं शिकू शकले. एवढंच नव्हे तर ‘इथून पुढं कोणत्याही गरजू विद्यार्थ्यास मदत करीत जा,अशी मदत हीच माझ्याविषयीची कृतज्ञता असेल’ ,असेही महात्मा फुलेंनी सांगितल्याचं त्यांनी म्हटलं.या ऐतिहासिक प्रसंगातून दोन गोष्टी दिसून येतात.पहिली म्हणजे केळुस्करसारखा हुशार परंतु ब्राह्मणेतर विद्यार्थी माझ्या ब्राह्मण जातीच्या कमी हुशार मुलांची संधी हिरावून घेतो’ असे म्हणून केळुस्करचा द्वेष करणारी बर्वे प्रवृत्ती ! आजही ही बर्वे प्रवृत्ती शिक्षणव्यवस्थेत कार्यरत आहे.या प्रवृत्तीने आतापर्यंत किती केळुस्करांचा अपमान केला असेल व किती केळुस्करांची शैक्षणिक कत्तल केली असेल ? 

     दुसरी गोष्ट म्हणजे महात्मा फुले यांच्या वैचारिक प्रभावाखाली तयार झालेली निष्पक्ष गोडबोले प्रवृत्ती ! या प्रवृत्तीने आतापर्यंत किती केळुस्करांचे शैक्षणिक जीवन फुलविले असेल !. आज देशाला कोणत्या प्रवृत्तीची गरज आहे?.मनुवादी बर्वे प्रवृत्तीची की,फुलेवादी गोडबोले प्रवृत्तीची ?.देशावर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांनी या प्रश्नाचं उत्तर शोधणं आवश्यक आहे !

    शुद्धोदन आहेर-९८२०१७२२९८,मुंबई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *