शुद्रांना इतिहास माहित नसेल,बौध्द रक्षा बंधन का करतात?

बातमी शेअर करा.

‘पंचशील धागा’ का सुरू झाला?.

जगातील जितकेही धर्म आहेत त्या धर्माची संस्कृती टिकविण्यासाठी त्या धर्मातील प्रचारकांनी आपल्या धर्मातील सणां (उत्सव) ना फारच महत्व दिले आहे. नसतील तर निर्माण केले. काही सण तर देवांशी निगडित केले. जेणेकरून लोकांनी किमान देवाच्या अनामिक भितीने सण साजरे करू देत आणि आपला धर्म आणि देवांना घरी जीवंत ठेवू देत. रक्षण करू देत. कारण 1.सण हेच लोकांच्या जीवनात मंगलमय-आनंदमय वातावरण निर्माण करतात. 2.सण हेच धर्माला आणि त्या धर्मात मानव निर्मित देव असतील तर देवानाही जीवंत ठेवण्याचे काम करतात. म्हणूनच मी सणांना प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजनची उपमा दिली आहे. हजारो वर्षाचा आर्य धर्म अर्थात ब्राम्हणी धर्म अर्थात वैदिक सनातनी धर्म अर्थात अर्थात (आजचा) हिंदू धर्म व या धर्मातील मानव निर्मित देव हे आजही इथल्या मूलनिवासी म्हणजेच बहुजन म्हणजे एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी, ओबीसी, एसबीसी प्रवर्गात समावेश असलेल्या हिंदू धर्मातील जातींतील लोकांच्या घराघरात जीवंत आहेत.  त्याचे कारण म्हणजे मूलनिवासी परकीय आर्य समाजाने अगदी जाणीवपूर्वक त्यांची धर्म संस्कृती व त्यांनी निर्माण केलेले देव जीवंत राहावेत यासाठीही अनेक सण निर्माण केलेत. उदाहरण म्हणून सार्वजनिक गणेश उत्सव हा सण अलिकडे म्हणजेच 135 वर्षापुर्वी ब्राम्हण उध्दारक बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केला. सार्वजनिक गणेश उत्सवाचे रूपांतर मूलनिवासींनी आपल्या घरात गणपती मुर्ती बसवून घरगुती गणेश उत्सवात केले. अशा पध्दतीचे आर्यांनी सुरू केलेले सण मूलनिवासी म्हणजेच बहुजन नित्यनियमाने साजरे करतात. प्रसंगी कर्ज काढून सण साजरे करतात. तशी म्हणच रूजवली गेली. ‘रिन (कर्ज) काढून सहन कर आणि उत्सव साजरा कर (सहन या शब्दाचा पुढे अपभ्रंश होवून सण शब्द झाला. आता लोक उत्सवाला सणच म्हणू लागले आहेत. पण सण हा शब्द सहन आहे. 

     मूळ इंग्रजी/हिंदी शब्दकोशामध्ये (डिक्शनरी) ही ‘सण’ या शब्दाला अर्थ नाही. उत्सवाला इंग्रजीत फेस्टीव्हल व हिंदीत त्यौहार म्हटले जाते आणि फेस्टीव्हल व त्यौहार ला मूळ मराठी शब्दकोशात उत्सव असा अर्थ आहे. सण नाही. अलिकडे सण शब्द घुसडला आहे. त्यामुळे येथे नाईलाजाने उत्सवाला सण म्हणावे लागत आहे हे वाचकांनी समजून घ्यावे व आपणही दुरूस्त व्हावे.)’ जर एकादा सण साजरा करण्याने मनुष्याच्या जीवनात मंगलमय-आनंदमय प्रसंग निर्माण होवून त्या दिवसांसाठी सण साजरा करणार्‍या व्यक्ती आणि त्या व्यक्तीच्या घरातील परिवाराचे दुःख विसरण्यास मदत होत असेल, तर मग तो कोणत्याही धर्माचा सण असो तो त्या परिवाराने साजरा करण्यास हरकत नाही. मात्र ज्या धर्मात ज्याना अस्पृश्य  (एससी व एसटी प्रवर्गातील हिंदू धर्मातील सर्व जाती) म्हणून वागवले, ज्याना भटक्याचे (एनटी, व्हीजेएनटी प्रवर्गातील हिंदू धर्मातील सर्व जाती)जीवन जगावे लागले, ज्याना वनवासी (एसटी प्रवर्गातील हिंदू धर्मातील सर्व जाती) म्हणून तुच्छवले, ज्याना नेमून दिलेली पायरी (ओबीसी व एससबीसी प्रवर्गातील हिंदू धर्मातील सर्व जाती) ओलांडण्यास मनाई केली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शुद्र वर्णातील या सर्व जातीच्या कुटुंबांना वैदिक सनातनी धर्मातील ब्राम्हण, क्षत्रिय व वैश्य वर्णीय साजरे करणारे सण हे साजरे करण्यास मनाई केली ते आर्यानी सुरू केलेले मूलनिवासी म्हणजेच शुद्र म्हणजेच बहुजनांनी सण साजरे करावेत का? जे कोणी ते सण साजरे करत असतील तर त्या सणातील केलेले गोड पदार्थ त्याना गोड तरी कसे लागतात? ते गोड/मिष्ठान पदार्थ खात नाहीत तर मानवी विष्ठा खातात. शुद्रांना सण साजरे करण्यास वैदिक सनातनी धर्माच्या प्रमुखांनी आजही विरोध केला असता पण भारतीय संविधानातील कायदा आणि अशा विरोधामुळेच धर्माला लागत चाललेली गळती हे त्यांच्या लक्षात आल्यानेच विरोध होताना दिसत आहे. कदाचित हे टिळकांनी हेरले. म्हणून तर त्यानी बहुजनांसाठी 5/10 दिवसासाठी गणेश उत्सव सुरू केला. आतातर या उत्सवाला धर्मांध सरकारने ‘राज्य मान्यता’ देवून वैदिक सनातनी धर्मातील सणांचे महत्व अधोरेखित केले.

     संविधानातील कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट झाली होती, कलम 14 ने समानता मिळाली, कलम 15 नुसार कोणताही भेदभावास मनाई केली, कलम 16 मुळे समान संधी मिळाली, कलम 19 अभिव्यक्त स्वातंत्र्याचा हक्क मिळाला तसेच कलम 340, 341 व 342 नुसार वरील सर्व प्रवर्गातील जातीच्या लोकांना कधी नव्हे ते मानाच्या व मार्‍याच्या सरकारी नोकर्‍यांची विशेष सोय करण्यात आली. म्हणजेच आरक्षण देण्यात आले. अन्यथा धर्मातील संहितेनुसार त्याना मरायच्याच चाकर्‍या करायला लागत होत्या. गुलाम होते साले. सांगायचे तात्पर्य की भारतीय संविधानामुळे मानपान, सन्मान मिळाला तरीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी गुलामासाठी धर्मांतर करण्याचा निर्णय का घेतला? त्यांना आपल्या स्वगृही धर्मात जावावे का वाटले? या प्रश्‍नाचे उत्तर म्हणजे 1. संविधानाच्या ढाचा बदलता येत नसला तरी संविधानात दुरूस्ती करता येते हे त्याना चांगले माहित होते. दि. 26 मार्च 1953 रोजी दिल्लीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या कार्यकारणीची बैठक झाली. त्या बैठकीत बाबासाहेब इशारा देताना म्हणतात, ‘दलित समाजास (येथे त्यानी दलित हा शब्द वापरला असला तरी संविधानातील सर्व आरक्षण लाभार्थी प्रवर्गातील सर्व जातीच्या लोकांसाठी त्यांचे हे सांगणे लागू होतेे) घटनेनुसार सरकारकडून ज्या सवलती (आरक्षण) मिळाल्या आहेत, त्या कायम स्वरूपाच्या नाहीत! आज ना उद्या त्या काढून घेतल्या जाणार. तेव्हा ह्या सवलतीवर, सरकारच्या ‘कृपाळू’ वृत्तीवर अवलंबून राहून दलित (आरक्षण लाभार्थी) समाजाची उन्नती होणार नाही.’  याची झलक म्हणजेच गेल्या वर्षी 1 ऑगस्ट 2024 रोजी एससी,एसटी प्रवर्गातील जाती-जातीमध्ये भेद निर्माण करणारा- उपवर्गीकरण करून आरक्षणाचे वाटप करणारा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. भविष्यात आरक्षणाला विरोध करत आलेले लोक सत्ताधारी होतच (आता सत्तेत जे लोक आहेत त्यांच्या संघाचा आरक्षण रद्द झाले पाहिजे हा अजेंडा आहे. म्हणून तर ते आरक्षण संपविण्यासाठी खासगीकरणाला प्रोत्साहन देत आहेत) राहिले, तर वरील कलमे रद्द किंवा कमजोर करू शकतात. २. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी सामाजिक स्वातंत्र प्राप्त करायचे असेल तर शुद्र-गुलामांना धर्मांतराशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. कारण वैदिक सनातनी धर्मातच राहिलो तर त्या धर्माचे मालक भविष्यात पुन्हा आपल्या धर्माची नियमावली (मनुस्मृती सारख्या.) बाहेर काढणार आणि आरक्षण समाजाला तुम्ही शुद्र आहात याची जाणीव करून देवून त्यांचे खच्चीकरण करणार हे बाबासाहेबांनी जाणले होते. याचा अनुभव गेल्या दहा वर्षापासून येत आहे.जातीवादाच्या घटनांत कमालीची वाढ झाली आहे, उघउपणे मनुस्मृतीचे समर्थन केले जावू लागले आहे, चातुर्वर्ण्यव्यवस्थाचा पुरस्कार केला जावू लागला आहे. याचा प्रत्यय म्हणजे भाजपच्या विद्यमान खासदार कंगना राणावत हिने भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 ला नव्हे तर आरएसएसचा आणि आरएसएसचे द्वितीय सरसंघचालक माधव गोळवलकर यांनी लिहिलेल्या  ‘बंच ऑफ थॉटस्’ या पुस्तकातील (ज्या पुस्तकात संविधानाला नाकारले आहे, आरक्षण रद्द करण्याचा विचार मांडला आहे, धर्मनिरपेक्ष, समाजवाद, समानता विरोध केला आहे, जातीवाद व चातुर्वर्ण्यव्यवसथेचे समर्थन केले आहे) अजेंडा राबविण्यासाठी भाजप 2014 ला सत्तेत आला तेव्हा पासून देशाला स्वातंंत्र्य मिळाल्याचे जाहीरपणे सांगितले. अशा लोकांच्या धर्मात मूलनिवासीना आज आणि भविष्यातही राहता येणार नाही हेच बाबासाहेबांना सांगायचे होते. 3. गुलाम व मालकाचा एक धर्म नसतो. शुद्र म्हणजेच गुलामाना धर्म नसतो. ज्या धर्मात त्याना, त्यांच्या पुर्वजाना अस्पृश्य-गुलाम म्हणून वागणूक दिली त्या धर्माला ते नरक म्हणणार की नाही? दि. 15 ऑक्टोबर 1956  च्या भाषणात त्यानी धम्म दीक्षा घेवून आपण नरकातून सुटल्याचा आंनद झाल्याचे सांगितले. ही तीन कारणामुळेच शुद्रांना धर्मांतराशिवाय पर्याय नसल्याचे बाबासाहेबांचे मत होते.

     मग सांगा, शुद्रामधील नमक हराम सोडून द्या पण किमान आज जे उठता-बसता बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जागर करतात, ‘जय भीम’ म्हटल्यशिवाय त्यांचा दिवस मावळत नाही, आम्ही बौध्द असल्याचे अभिमानाने सांगून धार्मिक मानाचा सन्मान मिळवतात, आपल्या घरातील लग्न, गृहप्रवेश, नामकरण, मरणोत्तर विधी बौध्द पध्दतीने करतात असे लोक बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाने जाणार आहेत की नाहीत? हा प्रश्‍न विचारणे इतक्यासाठी महत्वाचे आहे की त्यातील 98 टक्के लोक बाबासाहेबांशी गद्दारी करत तर आहेतच शिवाय हिंदू धर्मातील ‘गुलाम’ म्हणून मिरवत आहेत. बाबासाहेबांनी ज्यांच्या विरोधात संघर्ष करून सर्वकाही मिळवून दिले त्यांचे सणवार हे लोक साजरे करत असतील तर अशाना कोणी गद्दार म्हटले तर? आज बाबासाहेब हयात असते तर त्यानी अशांचा सन्मान फुलांनी केला असता की खेटारांनी? या प्रश्‍नाचे उत्तर शेमंड पोरही देईल.  जे क्षणिक लाभाचे आहे ते म्हणजेच त्यानी दिलेले तिन्ही प्रकारचे आरक्षण (शैक्षणिक, नोकरी व राजकीय) स्वीकारले.  पण बाबासाहेबांनी सांगितलेला धर्मांतराचा मार्ग अवलंबलेला नाही. ज्यानी बौध्द धम्माची दीक्षा घेतली ते, जे लोक आपल्या घरातील विवाह, गृहप्रवेश, मरणोत्तर विधी बौध्द विधीनुसार करू लागले ते व जे स्वतःची ओळख बौध्द म्हणून सांगू लागले आहेत ते  असे हे सारे खरेच बौध्द झाले आहेत का? जर कोणी ‘होय, आम्ही बौध्दच आहोत’ असे म्हणत असतील तर त्यांचे स्वागत केलेच पाहिजे. मात्र अशांना त्यागलेल्या जुन्या धर्मातील कोणतेही सण साजरे करता येणार नाही म्हणजे नाही.बौध्द धम्माला जीवंत ठेवण्यासाठी धम्मातीलच सणाची संस्कृती घरात रूजवली पाहिजे. बाबासाहेब काय म्हणतात ते वाचा. दि.14 जानेवारी 1951 रोजी मुंबईत केलेल्या भाषणात डॉ.बाबासाहेब म्हणतात, ‘बुध्द धर्माची दीक्षा घेतल्यानंतर तुम्हाला हिंदू धर्मातील मते आणि दैवते बुध्द धर्मात आणता येणार नाहीत. घरात खंडोबा व बाहेर बुध्द हे चालणार नाही. शिवाय ज्या हिंदू लोकांना बौध्द दीक्षा घ्यावयाची असेल त्यानी हिंदू धर्माच्या दृष्कृत्यांचा त्याग केला पाहिजे. जातीला मानणारे लोक बौध्द होतात व बौध्द धर्माचा ब्राम्हण धर्म बनवतात व बौध्द धम्माचे मूळच नाहिसे करतात. सर्व वाईट चाली बरोबर घेवून तुम्हाला बौध्द धर्मात येता येणार नाही. ज्यांना सवड असेल त्यानी येथे यावे व बौध्द धर्म शिकावा व त्यानंतरच त्याचा स्वीकार करावासा वाटला तर करावा. नाही तर बारा भाईची खिचडी चालायचे नाही. फक्त बौध्द धर्म पाळ इतर काही नाही.’ 

     जानेवारी ते डिसेंबर महिन्यापर्यंत जसे इतर धर्मात सण आहेत तसे बौध्द धम्मातही बारा महिने पारंपारिक सण आहेत. बौध्द धम्म तर मानवाचे दुःखमुक्त करण्यासाठी गौतम बुध्दांनी स्थापला. बुध्द म्हणतात, ‘उद्याचा दिवस आपला आहे की नाही हे कोणीच सांगू शकत नाही म्हणून आजचा दिवस हा मनुष्याच्या जीवनातील शेवटचा दिवस समजून त्या दिवसाचा आनंद घेेवून दुःखमुक्त जीवन जगले पाहिजे.’ दुःखमुक्त जगायचे असेल तर जीवनात घडलेल्या चांगल्या घटनेचा उत्सव साजरा केला पाहिजे. म्हणून तर धम्मातील चांगल्या घटनांचा उत्सव म्हणजेच सण निर्माण केलेत. त्यामुळे बौध्द व आंबेडकरी अनुयायानी धम्मातील सण साजरे करायलाच पाहिजेत. उत्सवाशिवायही दुःखमुक्त जगता येते हे जरी सत्य असले तरी आपल्या सारखेच इतर नसतात. त्यामुळे इतरांचे दुःख सणामुळे हलके होत असेल तर त्यांच्यासाठी घरात सण साजरे केले पाहिजेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी काय सांगितले याची आठवण करून देण्यापेक्षा आज शिक्षणामुळे प्रत्येकजण सुजाण झाला आहे. त्याला वैदिक सनातनी धर्मात आपल्या पुर्वजासह समाज बांधवाचा कसा अमानुष छळ झाला आहे याची जाणीव आहे. तरीही ते त्या धर्मातील सण साजरे करत असतील तर बौध्द धम्माची संस्कृती रूजणारच नाही. हेच चित्र महाराष्ट्रातच आहे. म्हणूनच मी येत्या धम्म विजया दसमीच्या मुक्तनायकच्या विशेषांकात ‘आजही महाराष्ट्रही बौध्द धम्माच्या दृष्टीने शून्यवतच’  या संदर्भात लेख लिहिणार आहे. 

   देशात एकमेव दैनिक मुक्तनायकच्या संघम दिनदर्शिकामध्येच बौध्द धम्मातील बारा महिन्यातील कोणते सण आहेत याची माहिती मिळेल. तसेच दैनिक मुक्तनायकमध्येच धम्मातील कोणता सण कशा पध्दतीने साजरा करायचा याची रूपरेषा वाचायला मिळते. अन्य कोणत्याच वर्तमानपत्र व कॅलेंडरमधून परिपूर्ण माहिती मिळत नाही हे मी ठामपणे सांगू शकतो. दै.मुक्तनायकचे महाराष्ट्रात लाखो वाचक झाले आहेत. सोशल मिडीयामुळे दै.मुक्तनायक दररोज वीजेच्या गतीसारखे महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यात राहत असलेल्या लोकांपर्यंत पोहचत आहे. दै.मुक्तनायकमधील धम्मातील उत्सव केव्हा आहे व तो कसा साजरा करायचा याची माहिती वाचूनही संबंधित कोणी उत्सव साजरा करत नसतील तर धम्मातील संस्कृती रूजेल का? आम्ही नागवंशीय बौध्द म्हणायचे आणि नागराजा पंचमी-नागलोक उत्सव साजरा करायचा नाही. गेल्या 29 जुलैला नागराजा पंचमी-नागलोक उत्सव होता. तत्पुर्वी 10 जुलैला धम्म जयंती होती. किती जणांनी धम्म जयंती साजरी केली? वर्षावास हा भिक्खूसाठी सक्तीचा असतो, नव्हे उपासकांसाठी. पण ‘लावली रताळ आली केळं’ प्रमाणे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले उपासक वर्षावास पाळत आहेत आणि भिक्खू इकडे तिकडे फिरत आहेत. वर्षावास पाळणार्‍यांपैकी बहुतांशी लोकही आज शनिवारी (दि.9 ऑगस्ट) हिंदू धर्मातील रक्षा बंधन साजरा करणार महणजेच करणार. कोणी स्वतःला बौध्द म्हणत असतील, तर त्यांच्याकडून 22 प्रतिज्ञाचे उल्लंघन होवू नये. अन्यथा तो धम्मद्रोह आहे. 21 वी प्रतिज्ञा निट समजून घेतली पाहिजे. पती-पत्नीमध्ये घटस्फोट झाला तर ते दोघे पुन्हा एकत्र येतात का? तसा एखाद्या धर्माबरोबर घटस्फोट घेतला असेल तर त्याना त्या धर्मातील कोणताही सण साजरा करता येणार नाही हा 21 व्या प्रतिज्ञाचा अर्थ आहे. 

     मुक्तनायक परिवारने बौध्दांनी आपल्याच धम्मातील सण साजरे करावेत यासाठी धम्मातील बर्‍याच सणांची खोज करून ते पर्याय म्हणून उभा केले आहेत. जर पर्याय नसतील तर योग्य असे पर्याय आणले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘नाते पंचशील धागा’ होय. सम्राट अशोक राजा धम्म विजया दसमी उत्सव पाच दिवस साजरा करत होते. तशी या उत्सवाची सुरूवात अश्‍विनी महिन्यातील संघ पौर्णिमाच्या प्रतिपदापासून सुरूवात होत होती. पहिले नऊ दिवस हे धम्म दीक्षा घेणार्‍यासाठी श्रामणेर-उपोसथ व्रताचे असायचे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी सम्राट अशोक राजा यांच्याच धम्म दीक्षाचा दिवस निवडला आणि त्यांच्या बरोबर विविध धर्म, पंथ, जातीच्या लोकांनी धम्म दीक्षा घेतली. असे लोक धम्मात येत असतील, तर त्यांचेे जुन्या बौध्द उपासक व उपासिकांशी नाते दृढ करण्यासाठी पाच दिवसाच्या धम्म विजय दसमी उत्सवामध्ये ‘पंचशील धागा’ बांधून धम्मातील नाते घट्ट करण्यासाठी पर्याय आणला. ज्यांना धम्माचीच संस्कृती रूजवायची आहे, ज्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यानी ज्या धर्मात गुलाम केले आहे त्या धर्मातील कोणताही सण साजरा करायचा नाही असे सांगून गेल आहेत ना, आमच्या पुर्वजांनी त्या धर्मातील कोणताही सण साजरा करायचा नाही असा ठराव (1936 ला महार परिषद, मुंबई.) केला आहे ना मग त्या धर्मातील भाऊबीज व रक्षाबंधन करायचे नाही ते नात्याचा पंचशील धागा बांधत आहेत.  हे लोक सच्चे आंबेडकरवादी, आंबेडकरी अनुयायी होय. अभिनंदनास पात्र असल्याचे म्हणायचे का?

 कोणत्याही धर्मातील कुठल्याच सणांबद्दल आक्षेप घेण्याचे कारण नाही. त्या धर्माचे सण त्या धर्मातील लोकांना प्यारेच. मग बौध्दांना आपले सण प्यारे का नाहीत? कोणतेही सण एकाचवेळी सर्वांनी एकत्रित येवून साजरे करण्याची सुरूवात झालेली नाही. पहिल्यांदा कोणीतरी सुरूवात केली आणि त्यांचे रूपांतर वटवृक्षाप्रमाणे किंवा समुद्ररूपात झालेे. उदा. टिळकांनी गणेश उत्सव सुरू केला. तसे ‘नात्याचा पंचशील धागा’ बांधण्याचा उपक्रम दहा वर्षापुर्वी पारंपारिकनुसार पाच दिवस साजरा होणार्‍या धम्म विजया दसमी उत्सवात सुरू करण्यात आला. या उत्सवाच्या दुसर्‍या दिवशी नात्याचा पंचशील धागा बहिण आपल्या भावाला बांधून नाते जपते, तर भाऊ आपल्या बहिणीला, बहिण आपल्या बहिणीला, भाऊ आपल्या भावाला, पत्नी पतीला आणि पती पत्नीला धागा बांधते. नात्याचाच पंचशील धागा असल्याने हितचिंतक, आप्तस्वकीय, मित्र, परधर्मिय यानाही हा धागा बांधून ते ते नाते जपले जाते. हिंदू धर्मिय भगिनी जर बौध्द किंवा आंबेडकरी अनुयायी यास राखी बांधून परधर्मिय नाते निर्माण करत असेल तर बौध्दांनीही आपल्या धम्मातील आदर्श नाते संस्कृती रूजविण्यासाठी त्या परधर्मिय बंधू व भगिनीला पंचशील धागा बांधला तर बिघडले कुठे? म्हणून पंचशील धागाचा पर्याय योग्य वाटू  लागला आहे. काहीजण म्हणतील की रक्षा बंधन हा बहिण भावाचा सण आहे. त्यात वैदिक सनातनी धर्माचा काय संबंध? होय संबंध आहे म्हणून सांगावे लागते. काल शुक्रवार दि.8 ऑगस्ट 2025 च्या दैनिक नवराष्ट्र मध्ये रक्षा बंधनचा संबंध कृष्ण व द्रौपदीशी जोडला आहे. कथा काय सांगितली ते पाहू, ‘एकदा भगवान श्रीकृष्ण यांच्या बोटाला इजा झाली आणि त्यातून रक्तस्त्राव होत होता. हे बघून द्रौपदीने आपल्या पदराची एक चिंधी फाडली आणि भगवान श्रीकृष्णांच्या बोटाला बांधली. श्रीकृष्णाने द्रौपदीचे वस्त्रहरणाच्या वेळी रक्षण केले तसेच भगवान श्रीकृष्णांच्या बोटाला इजा झाली असताना तेव्हा द्रौपदीने पदराची चिंधी बांधली. याचे रुपांतर होऊन रक्षाबंधन या दिवशी बहिणीने भावाला राखी बांधण्याची प्रथा सुरू झाली.’ राखी बंधनाचा संबंध ब्राम्हण देव विष्णूशीही जोडला आहे. सांगायचे तात्पर्य काय की रक्षा बंधन 

एका धर्मातील देवांशी जोडला असल्याने तो सण इतर धर्मियांचा कसा होवू शकेल?

   सम्राट अशोक कालिन बुध्द (रथ) उत्सव हा सर्व प्रथम कोल्हापुरातील बानकर परिवारने 2025 पासून सुरू केला.  हा उत्सव सात दिवस चालतो. ज्यानी हा उत्सव सुरू केला त्यानी घरातील गणपती उत्सव साजरा करणे बंद केले. महाराष्ट्रातील 23 जिल्हयात हा उत्सव सुरू झाला आहे.  येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या धम्म विजय दसमी उत्सवाच्या तिसर्‍या दिवशी आपल्या बहिणीकडून हातात पंचशील धागा बांधून नाते जपता येणार आहे.इतके सांगूनही आज स्वतःला बौध्द म्हणणारे, आंबेडकरी अनुयायी म्हणणारे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती घरात व बाहेर करणारे रक्षा बंधन उत्सव साजरा करणार असतील तर त्यांच्यादृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आम्हीच मुर्ख दुसरे काय…

देवदास बानकर ९२२५८०६९९०,संपादक दैनिक मुक्तनायक कोल्हापुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *