तेव्हा उघडलाच नाही काळा रामाचा दरवाजा…आता रांगाच रांगा लागल्या.

बातमी शेअर करा.

नाशिकच्या काळ्या रामाच्या मंदिरात आम्हाला माणूस म्हणून प्रवेश नव्हता म्हणून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता. त्यामुळे आम्हाला आज माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला. बरेच लोक ते विसरून आता ९६ वर्धापन दिनाला काळ्या रामाचे दर्शन घेतांना दिसतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात जाती अंतासाठी दोन महान लढे उभे केले. त्यात काळाराम मंदिराचा सत्याग्रह सर्वात क्रांतिकारक ठरला. या लढ्याने धर्मशास्त्रा ला आव्हान दिले. नाशिकच्या पंचवटी विभागात रामाची दोन मंदिरे आहेत, ती ओळखण्यासाठी मूर्तीच्या पाषाणावरुन काळाराम व गोराराम अशी नावे प्रचारात आली. काळारामाचे मंदिर हे गोदावरीच्या पूर्वतीरावर पंचवटी या वस्तीत आहे. नाशिकच्या पंचवटीतील ऐतिहासिक काळाराम मंदिर सरदार रंगराव ओढेकर यांनी गोपिकाबाई पेशवे यांच्या मार्गदर्शनाखाली १७८२ ते १७९० च्या दरम्यान बांधले.गोदावरी नदीच्या रामकुंडातील काळ्या पाषाणातील मूर्ती येथे प्रतिष्ठापित आहेत. १२ वर्षांत पूर्ण झालेले हे भव्य मंदिर पेशवेकालीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असून, १९३० मध्ये येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेशासाठी ऐतिहासिक सत्याग्रह केला होता. या मंदिरात अस्पृशांना प्रवेश नव्हता. 

   नाशिकच्या काही मंडळीनी मंदिर प्रवेशावर चर्चा करण्यासाठी डॉ.बाबासाहेबांची भेट घेतली. शेवटी काळाराम मंदिर प्रवेशासाठी रितसर मंदिर ट्रस्टीना नोटीस देऊन सत्याग्रह करण्याचे ठरले.या सत्याग्रहासाठी, नाशिक सत्याग्रही समिती तयार करण्यात आली. त्यात अनुक्रमे दादासाहेब गायकवाड,रंगनाथ भालेराव,रामभाऊ जाधव,रामजी पास, भदुजी निकाले, पांडुरंग सबनीस, पतित पावनदास वर्धेकर, तुळशीराम काळे, नानासेठ चंद्रमोरे,अमृतराव रणखांबे, सावळाराम वाणी, शांताबाई दाणी, यमुनाबाई जाधव, मंजुळाबाई वाणी, गऊबाई उनवणे इत्यादी होते. समितीची सभा घेण्यात आली. सभेत ठरल्याप्रमाणे दादासाहेब गायकवाड यांनी काळाराम मंदिराचे पुजारी गणेश रामचंद्र पुजारी यांना नोटीस दिली. की,आम्ही अस्पृश्य लोक २ मार्च १९३० रोजी, राममंदिर प्रवेश करुन रामचंद्राचे दर्शन घेणार आहोत. त्याबाबत तुम्ही अगर इतर सवर्ण हिंदूनी आम्ह विरोध केला तर,आम्ही प्रवेशासाठी सत्याग्रह करु,याबाबत काही म्हणणे असल्यास आम्हास कळवावे, असे आवाहन केले. या नोटीसाला तब्बल पाच महिने झाले तरीही ट्रस्टीकडून काहीही उत्तर न आल्याने रितसर प्रवेशासाठी मंदिर समितीने २ मार्च १९३० रोजी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मंदिर प्रवेश निश्चित केला. या ऐतिहासिक प्रवेशाचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्र,कर्नाटक, गुजरात येथून सुमारे १५ हजार लोक सत्याग्रही म्हणून नाशिकला दाखल झाले होते. १ मार्च १९३० रोजी, सत्याग्रहासाठी जमलेल्या समुदायासमोर डॉ.बाबासाहेब अतिशय गंभीर व शांतपणे सत्याग्रहाचा उद्देश समजावून सांगतांना म्हणाले की, ‘आज आपण मंदिर प्रवेश करणार आहोत पण. केवळ मंदिर प्रवेशामुळे आपले सर्व प्रश्न सुटनार असे नाही.

   आपल्या प्रश्नाचे व समस्यांचे स्वरूप सामाजिक,धार्मिक,आर्थिक,शैक्षणिक असे व्यापक आहे’. शेकडो वर्ष हिंदूनी आपणास समतेच्या हक्कापासून दूर ठेवले आहे. तेच हिंदू आज आपले हिरावलेले माणुसकीचे हक्क आपणास दयावयास तयार आहेत की नाही, हा प्रश्न आज मंदिर प्रवेशाने सुटणार आहे. डॉ.बाबासाहेबांसह पतितपावनदास, पा.ना.राजाभोज,नाईक मास्तर,प्रधान इत्यादीची यावेळी भाषणे झाली.दुपारी ३ वाजता प्रत्येकी रांगेत चार चार अशी १६ हजार लोकांची भव्य मिरवणूक निघाली या मिरवणुकीत ५०० स्त्रिया उत्साहाने सामील झाल्या होत्या. सायंकाळी ५ वाजता मिरवणूक काळाराम मंदिराजवळ पोहचली. पण मंदिराचे दरवाजे सनातन्यांनी बंद करून घेतले होते. मिरवणूक गोदावरी घाटावर नेण्यात आली.तेथे बाबासाहेब व शेठ तेरसी मुंबई यांची सभा झाल्यानंतर तेथून लोक महारवाड्यात आले. ३ मार्च १९३० ला सकाळी ९ वाजता डॉ.बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन मंदिराच्या दारात धरणे धरुन,सत्याग्रह पूर्ण यशस्वी होईपर्यत लढा सुरु ठेवण्याचा निर्धार केला. त्यानंतर या सत्याग्रहींनी मंदिराच्या चारही दरवाजावर धरणे धरले, सत्याग्रहाच्या निर्धार स्पृश्य व अस्पृश्य पुढाऱ्यात तडजोड होऊन ९ मार्च १९३० ला रामनवमीच्या दिवशी रामाच्या रथाचे दोरखंड ओढण्यास अस्पृश्यांना परवानगी देण्यात आली. पण,मध्येच अशी आवई उठली की,या रामनवमीला निघणारा रथ अस्पृश्य स्त्रिया ओढणार आहेत. उलट रथ ओढण्यासाठी बाबासाहेबांनी निवडक तगड्या तालीमबाजांना ठेवले होते पण,अस्पृश्यांनी आधीच ठरविल्या प्रमाणे रथ इतक्या वेगाने पळवून नेला की,अस्पृश्य लोक रथाला हातही लावू शकले नाहीत,अस्पृश्य लोक रथामागे धावू लागताच स्पृश्य लोकांनी लाठ्या काठ्या, दगडांनी अस्पृशांना मारहाण केली. डॉ.बाबासाहेबांनी यावेळी जखमी झाले. काही मंडळीनी बाबासाहेबांभोवती कडे तयार केले व त्या ठिकाणावरून हलविले. त्यानंतरही सत्याग्रहांनी दरवाज्यावर धरणे सत्याग्रह पुन्हा सुरु केला. नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह नेटाने लढला जात होता.त्याच काळात डॉ.बाबासाहेबांना गोलमेज परिषदेकरिता लंडनला जावे लागले,

    बाबासाहेबांनी परतल्या नंतर ३ मार्च १९३४ या दिवशी नाशिक सत्याग्रह समितीला मुंबईहून पत्र पाठवून राममंदिर प्रवेश सत्याग्रहाचा हेतू सफल झाल्यामुळे सत्याग्रह पूर्णपणे स्थगित करण्याच्या सूचना दिल्या.  त्याप्रमाणे सत्याग्रह बंद करण्यात आला. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाने दादासाहेब गायकवाड,पी.जे.रोहम,अमृतराव रणखांबे,बी.एस.मोरे, लंछिंगकर,के.बी.जाधव,देवधर डांगके,रंगनाथ भालेराव, सावळाराम वाणी,तुळशीराम काळे,संभाजी रोकडे,सीताराम काळू हाटे,शंकरराव श्रावण गायकवाड उर्फ बेलमास्तर इत्यादी कार्यकर्ते पुढे आले. याच सत्याग्रहातून कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नेतृत्व भारतीय राजकारणाच्या क्षितीजावर तळपले. दादासाहेबांनी ज्या निष्ठेने व चिवटपणे हा लढा लढला. त्याला इतिहासात तोड नाही. महाकवी वामनदादा कर्डक आपल्या गितातून असे म्हणतात, “गोदातिरी पडल, तरी सैनिक माझा उघडलाच नाही काळा रामाचा दरवाजा ” 

  श्रद्धा आणि भक्तीचा प्रवास काळाराम मंदिराला भेट देणे म्हणजे केवळ दर्शन नाही, तर एक अद्भुत आध्यात्मिक आणि ऐतिहासिक अनुभव आहे. नाशिकच्या पवित्र भूमीत वसलेले हे मंदिर भक्ती, वास्तुकला आणि इतिहास यांचे अनोखे संगमस्थान आहे. काळ्या दगडात कोरलेली अप्रतिम रचना, भव्य शिखर आणि शतकानुशतके टिकून राहिलेली भव्यता यामुळे हे मंदिर महाराष्ट्राच्या सर्वात महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे.संपूर्ण मंदिरातील शांतता आणि दिव्यता मनाला अपूर्व समाधान देते. येथील वातावरणात एक अदृश्य सकारात्मक ऊर्जा जाणवते,जी प्रत्येक भक्ताच्या हृदयाला स्पर्श करते.इतिहासप्रेमींना येथे जरूर यावे. पेशव्यांच्या काळात बांधलेले हे मंदिर नाशिकच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वारशाचे प्रतीक आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी येथे केलेल्या सत्याग्रहाने जागतिक किर्तीचा इतिहास घडवला.रामाच्या मंदिरात सर्वांना श्रद्धा आणि भक्तीचा समान अधिकार असला पाहिजे हे  डॉ.बाबासाहेबांनी सत्याग्रहाने जगाला दाखवून दिले. त्यामुळेच काळा राम मंदिर पाहण्यासाठी जगभरातून लोक पाहण्यासाठी येत आहेत.

या मंदिराची यात्रा एक अविस्मरणीय क्षण देऊन जाते.बाबासाहेबांच्या केलेल्या सत्याग्रहा ला भक्तिभावाने नतमस्तक व्हा, भव्य वास्तुकलेचे सौंदर्य अनुभव घ्या आणि नाशिकच्या या ऐतिहासिक मंदिराच्या दिव्य वातावरणात स्वतःला हरवून टाकाल. एकदा नक्की भेट द्या आणि प्रभू रामा तेव्हा ही नव्हता आज ही नाही.पण भव्य दिव्य मंदिर आहे ते बांधणारे हात कोणालाच दिसत नाही. त्यासाठी पैसे खर्च करणाऱ्याचे नांव आहे. पण कारागिराच्या कला कौशल्यांची कुठे ही नोंद नाही. रामाचा दरवाजा उघडण्यासाठी प्रदीर्घ असा लढा दिला. कर्मठ सनातन्यांनी मात्र कुलूपबंद केले,पण पुजारी माणसांना किंवा त्या देवाला पाझर फुटला नाही. तोही त्या अवस्थेत बंदीवान राहिला.परंतु या ऐतिहासिक सत्याग्रहाचा इतिहास लिहला गेला आहे.त्यातून किती प्रेरणा घ्यावी ही प्रत्येकाच्या हातात आहे. काळा रामाच्या मंदिरात दर्शनसाठी रांगा लावून दर्शन घेऊन दुख नष्ट होणार नाही.त्यासाठी संघर्षच करावाच लागेल.जगाचे पोशिंदे शेतकरी, शेतमजूर लाखोंच्या संख्येने दररोज दर्शन घेतात. पण त्यांच्या समस्या सोडविण्याची बुद्धी काळा राम राजकीय नेत्यांना देत नाही. म्हणून कष्टकरी कामगार शेतमजूर शेतकरी दररोज जगण्यासाठी सत्याग्रह करीत आहेत. त्याचा इतिहास लिहला जात नाही. म्हणूनच तो सरकारी नोकरी करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रेरणादायी होतांना दिसत नाही.काळा राम मंदिराच्या सत्याग्रहात सहभागी ज्ञात अज्ञात शूरवीरांना ९६ व्या वर्धापन दिनानिमित्य विनम्र अभिवादन.

सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडुप,,मुंबई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *